सातारा (वृत्तसंस्था) ग्रामपंचायत निकालाचे कल हाती यायला लागले आहे. सातारा जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतींमधील १२३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर ९८ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे ६५२ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून ९५२१ उमेदवार रिंगणात उतरले होते. अशातच पहिला निकाल हाती आला असून कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे. राज्यातील सत्तेचं समिकरण पाहता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी सर्वाधिक ठिकाणी बिनविरोध निवडून आले आहे.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा ८-१ ने धुव्वा उडवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातून पहिली गुड न्यूज आल्याचं दिसत आहे. साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यातील इतर ग्रामपंचायतींचा निकाल काय लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी ७९ टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली होती. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १६२ ग्रामपंचायतींसाठी २० जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे प्रत्यक्षात १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.
राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही निवडणुका बिनविरोध झाल्या असून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक अनेक ठिकाणी बिनविरोध झाली आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. जवळपास १४१० जागा या बिनविरोध झाल्या. यात स्थानिक पातळीवर आघाड्यांकडे सर्वाधिक ५२५ जागा आहे. तर राजकीय पक्षांमध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक २७८ जागा आहे.