धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयात आज कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे उत्साहात स्वागत करुन विद्यालयाची माहिती दिली.
याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहितदादा पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. जळगावहुन अमळनेर येथे कार्यक्रमासाठी जात असताना त्यांनी पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील विद्यालयात सदिच्छा भेट दिली. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी रोहित पवार यांनी विद्यालयाच्या कॅम्पसला भेट देऊन तेथील सोईसुविधांबाबत समाधान व्यक्त करत प्रतापरावजी पाटील यांच्या सोबत चर्चा केली. तसेच शाळेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डी. डी. कंखरे, इंग्लिश मेडियमचे प्राचार्य सचिन पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांची उपस्थिती होती.
राज्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणार नुकसान भरपाई
राज्य शासनाने जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पुरपरिस्थीतीमुळे शेतीपीकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. याला सरकारने मान्यता दिल्यामुळे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी १० हजार, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी १५ हजार तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रूपये प्रति हेक्टर अशी वाढीव दराने मदत दिली जाणार असून याचा जिल्ह्यातील सुमारे ६ लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा
यंदा जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा फटका पडला होता. यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून गेला असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून ही प्रक्रिया आता अंतीम टप्प्यात आहे. दरम्यान या संदर्भात दिनांक १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने व वाढीव दराने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. याला राज्यमंत्री मंडळाने मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक २१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे.
आधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार जिरायत पिकांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ६ हजार ८०० रूपये इतकी मदत दिली जात होती. आता नवीन शासन निर्णयानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रूपये इतकी मदत मिळणार आहे. बागायत पिकांसाठी आधी २ हेक्टरच्या मर्यादेत १३ हजार ५०० रूपये प्रति हेक्टर इतकी मिळणारी मदत आता १५ हजार रूपये प्रति हेक्टर इतकी वाढविण्यात आली आहे. तर बहुवार्षिंक पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत १८ हजार रूपये प्रति हेक्टर इतकी मिळणारी मदत आता २५ हजार रूपये प्रतिहेक्टर इतक्या दराने मिळणार आहे.
जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
दरम्यान, जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान बऱ्याच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका पडला होता. या प्रामुख्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर आदींसह अन्य तालुक्यांचा समावेश होता. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आले असून यातून जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ५ हजार १७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात ५ लाख ७७ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकाची हानी झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता राज्यशासनाच्या निर्णयानुसार वाढीव दराने नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना सुमारे साडे पाचशे कोटी रूपयांची मदत यामुळे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.