नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशनाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. कोर्टाने असे म्हटले की, मृत व्यक्तीच्या परिवाराला मिळाणारी नुकसान भरपाई ही दुसऱ्या कल्याण योजनेपेक्षा वेगळी असणार आहे. अर्जाच्या ३० दिवसांच्या आतमध्ये हे पेमेंट केले जाणार आहे.
कोरोना मृतांच्या कुटुंबाला देण्यात येणारी ही मदत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कोषातून देण्यात येणार आहे. २३ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती एएस बोपन्ना यांच्या खंडपीठाने या प्रकरणी केंद्राला कोरोना मृतांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते.
३० जून रोजी दिलेल्या आदेशात सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. कोर्टाने असे मानले की, या प्रकारच्या आपत्कालीन काळात लोकांना नुकसान भरपाई देणे सरकारचे वैधानिक कर्तव्य आहे. मात्र नुकसान भरपाईची रक्कम किती असेल हा निर्णय कोर्टाने सरकारवर सोडला होता. तेव्हा सुप्रीम कोर्टाने नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांनी म्हटले की, ६ आठवड्यात नुकसान भरपाईची रक्कम ठरवून राज्यांना सांगावी. NDMA ने नंतर कोर्टाकडून अतिरिक्त वेळ मागून घेतला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर १२ आठवड्यांनी त्यांनी नुकसान भरपाईचा निर्णय घेतला. त्यानंतर कोर्टाने औपचारिक मंजूरी दिली आहे.
















