रावेर (प्रतिनिधी) आम्ही प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून आपल्या पत्नीच्या माहेरच्या लोकांनी आपल्या घरी येत आईवडीलांना, भावाला जबर मारहाण करत पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार एका तरुणाने सावदा पोलिसात दिली आहे. या प्रकरणी पाच प्रमुख जणांसह इतर 30 ते 40 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सावखेडा येथील प्रफुल्ल पाटील या तरुणाने जळगाव येथील तरुणीसोबत प्रेम विवाह केला. बऱ्हाणपूर येथील न्यायालयात नोटरी पद्धतीने प्रेमविवाह केला होता. नंतर दोघे सावखेडा येथे घरी आले होते. आपल्या मुलीने परस्पर प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून तिच्या माहेरकडील पाच नातेवाईकांसह इतर ३० ते ४० जणांनी १९ मे च्या दुपारी दिड वाजेच्या सुमारास तिचे सावखेडा बुद्रुक ता. रावेर येथील सासर गाठले. चारचाकी आणि दुचाकीने आलेल्या सर्वांनी मिळून विवाहीतेचा पती प्रफुल पाटील याच्यासह घरातील इतर सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण सुरु केली. त्यानंतर आपल्या पत्नीला नवविवाहीत पत्नीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून तिचे अपहरण करत जळगावच्या दिशेने पलायन केल्याचेही प्रफुल पाटील याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला भा.द.वि. 365, 143, 148, 149, 452, 324, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले हे करत आहेत.