धरणगाव (प्रतिनिधी) येथील सरकारच्या मालकीच्या गट क्र. ९४७ या २५ एकर क्षेत्रफळ असलेल्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे उघडकीस आले आहे. ही जमीन शासनाच्या वतीने धरणगाव नगरपालिका व्यवस्थेसाठी देण्यात आलेली आहे.
यातील काही भाग सामाजिक वनीकरण विभागासाठी वृक्षारोपणासाठी देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष वृक्षारोपण करताना अडथळा निर्माण झाल्याची माहिती गायरान बचाव मंचच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार त्यांनी तहसीलदार व नगरपालिका प्रशासनाकडे केली.
मिळालेल्या माहितीनुसार, या जमिनीवर ९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री बेकायदेशीररीत्या दफनविधी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर तहसीलदारांनी जागेची पाहणी करून चौकशी केली आणि ११ ऑगस्ट २०२५ रोजी आदेश काढून मुख्याधिकारी नगरपालिकेला अतिक्रमण तात्काळ काढून टाकण्याचे तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी करून संपूर्ण अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी गायरान बचाव मंचतर्फे करण्यात आली आहे. तसेच अतिक्रमण न काढल्यास जनजागृती मोहीम, सह्या मोहीम, आंदोलन, मोर्चा व उपोषण असे टप्प्याटप्प्याने कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असा इशारा मंचतर्फे देण्यात आला आहे.













