जळगाव (प्रतिनिधी) आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असून यातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण ठोस पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी दिली आहे.
आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. यावर प्रतिक्रिया देतांना माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत या माध्यमातून अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार असल्याचे प्रतिपादन केले. आ. महाजन म्हणाले की, सध्या कोविडच्या कालावधीत जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला असतांना आपण कोरोनावर मात करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलले आहेत. तर याच्या जोडीला अर्थव्यवस्था गतीमान करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.
आ. महाजन पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या वाटेलाही यात भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. यात नागपूर व नाशिक येथील मेट्रोसाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे. तर भुसावळ-खरगपूर कॉरिडॉरमुळे माल वाहतुकीची सुविधा होणार असून याचा स्थानिक शेतकर्यांसह व्यापार्यांना लाभ होणार आहे. एकंतरीत पहाता हा अर्थसंकल्प समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांच्या हितासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आ. गिरीश महाजन यांनी केले आहे.