जळगाव (प्रतिनिधी) एका छोट्या गोंधळामुळे दोन नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार शहरातील जीएमसीमध्ये झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
जीएमसीमध्ये प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय २०, टहाकळी, भुसावळ) आणि प्रतिभा भिल ( वय २०, कासमपुरा, पाचोरा) या दोन्ही गरोदर महिला भरती झाल्या होत्या. प्रसूती दरम्यान, दोघांची प्रकृती अत्यावस्थ असल्यामुळे त्यांचे तातडीने सिझर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच मिनिटांच्या अंतराने दोघींचे सिझर झाले. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली. पण नवजात शिशु पालकांकडे सोपविताना निरोप देण्यातील गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली. अर्ध्या तासाने हा प्रकार लक्षात अल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशुंचे पालक आक्रमक झाले. त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले. यानंतर मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच ठरत नव्हते.
वाद वाढत चालला असल्याने पाहून प्रशासनाने दोन्ही नवजात शिशुंना आपल्या ताब्यात घेतले असून खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशु आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एक समिती देखील गठीत केली आहे. दरम्यान, डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच नवजात शिशुंचे खरे पालक कोण हे ठरणार आहे.