नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ समोर आलाय. शाळेतील कागदपत्रांनुसार प्रताप दिघावकर वयाच्या केवळ बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेत असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खात्री करा आणि योग्य कागदपत्रे कार्यालयाला द्या, अशी सूचना दिघावकर यांनी शिक्षण घेतलेल्या निटाणे इथल्या नुतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.
प्रताप दिघावकर यांनी १९७० मध्ये शाळेत प्रवेश केला आणि १९७६ मध्ये शाळा सोडल्याचा त्यांचा दाखला आहे. त्यामुळे त्यांनी कधी, कितव्या वर्षासाठी शाळेत प्रवेश घेतला याची माहिती विचारण्यात आली आहे. त्यांची जन्मतारीख ३१ मे १९६४ आहे यात म्हटलं आहे. याबाबत दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण सरकारने बंद केलं आहे. माझी जन्मसाल १९६१ ग्राह्य धरण्यात आली आहे. मी १ मे रोजी निवृत्त होत आहे. माझ्याकडूनच अर्ज करण्यात आला होता. जुन्या काळी काही नोंदी केल्या जातात त्यामुळे अर्ज केला होता, पण हा विषय आता संपला आहे, असं ते म्हणाले.
सटाणा तालुक्यातील ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले त्या शाळेशी पोलीस विभागाचा पत्रव्यवहार सुरु असून दिघावकर यांची जन्मतारीख काय नोंदवली आहे, त्यांचे वर्गमित्र कोण होते याची माहिती मागवण्यात आली आहे.