नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald) ईडीकडून (ED) चौकशी सुरू आहे. मंगळवारी दहा तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर टायर फोडून जोरदार आंदोलन केले.
ईडीच्या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. आंदोलकांनी ‘मी देखील राहुल आहे’ असे फलक हातात धरत निदर्शने केली. अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाजवळही जोरदार निदर्शने सुरू केली असून, रस्त्यावर टायर पेटवण्यात आले. आमचा आवाज दाबता येणार नाही, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी पोलीसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली असून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘भाजप, मोदी सरकार आणि दिल्ली पोलीस आता गुंडगिरीवर उतरले आहेत. एआयसीसी (AICC) कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मारहाण करून संयमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आम्ही गांधीवादी, शांतताप्रिय आणि अहिंसक आहोत. कार्यालयाचे दरवाजे तोडून गुंडगिरी केली, तर काँग्रेसचे कार्यकर्ते गप्प बसतील, असे समजू नका. आम्हाला कसे उत्तर द्यावे हे देखील माहित आहे, अस सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.