नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विश्व हिंदू परिषदेच्या महासचिवांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे आता नवा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राम मंदिरासाठीची चळवळ ही स्वातंत्र्यसंग्रामापेक्षाही मोठी होती, असं विधान त्यांनी केलं आहे.
१९४७ साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. पण राम मंदिरासाठीच्या चळवळीमुळे आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळालं. ही स्वातंत्र्य चळवळीपेक्षाही मोठी चळवळ होती, असं सुरेंद्र जैन म्हणाले. ते असंही म्हणाले की राम मंदिरामुळे राम राज्य उभारण्याच्या प्रवासाला सुरवात झाली आहे आणि हे मंदिर जेव्हा बांधून पूर्ण होईल तेव्हा भारताचं नशीब बदलेल. ते म्हणाले, सध्याचं शतक हे रामाचंच आहे. मंदिरासाठी दान करण्याची चळवळ ही संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणारी ठरली आहे. यामुळे हे सिद्ध होतं की फक्त राम या देशाला एक करु शकतो. धर्मनिरपेक्ष राजकारणाने देश दुभंगलाच आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अरुण कुमार यांच्या सब के राम या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान रविवारी जैन बोलत होते. ते असंही म्हणाले की, राम मंदिराच्या चळवळीमुळे हिंदू खडबडून जागे झाले आहेत. ही चळवळ हिंदूसाठी आत्मसाक्षात्कार घडवणारी ठरली आहे.