पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भर रस्त्यात लावलेली दुचाकी बाजूला लावा, असे सांगितल्याचा राग आल्याने दोन पोलिसांना दोघांनी (Pahur Police) बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजता घडली. यात एक पोलिस गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Jalgaon Crime News)
पहूर बस स्थानक परिसरातून रात्री जळगावहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसेसचे प्रमाण जास्त आहे. याच मार्गावर दोघांनी दुचाकी लावलेली होती. या वेळी कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी अनिल सुरवाडे व वाहन चालक रवींद्र मोरे यांनी त्यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. याचाच राग आल्याने दोघांनी पोलिसांना दमदाटी देत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात अनिल सुरवाडे यांना गंभीर दुखापत करून ते दोघे पसार झाले. या नंतर अनिल सुरवाडे यांना पहुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार करण्यात आले. ते गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
या प्रकरणी पहूर पोलिस दोन्ही संशयितांचा कसून शोध घेत आहेत. पहूर पोलिसांत मारहाण केल्याप्रकरणी रात्रीउशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. घटनेनंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. पहूर पोलिसांनी लागलीच बंदोबस्त वाढविला आणि बसस्थानक परिसरातील दुकाने बंद केली. हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.