चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व घेऊन घरी गेलेल्या रुग्णांना लागणाऱ्या फॅबी फ्ल्यू गोळ्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या गोळ्या प्रशासनाने लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा चाळीसगावातील गोर गरीब जनतेला वाचविण्यासाठी सर्व पक्षीय व संघटना मिळून रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल यांनी दिला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हंटले म्हंटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगावमधील ट्रामा केअर सेंटर व अंध शाळेमधील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपयुक्त असणाऱ्या फॅबी फ्ल्यू या गोळ्या देखील उपलब्ध नाहीत. रुग्ण त्या गोळ्यांची वाट पाहत असून अनेकांची तब्येत देखील खालावली जात आहे.
उपचारासाठी औषधी नाहीत म्हणून डॉक्टर व स्टाफ चिंतेत आहेत. अनेक पेशंट फॅबी फ्ल्यूचा उपचार घेवून बरे होवून घरी जातात. पण आता या गोळ्या देखील वरील दोन्ही सेंटरमध्ये नसल्याने नवीन संकट उभे राहिले आहे. कदाचित चाळीसगावकरांना आणखी वाईट बातमी या परिस्थितीमुळे ऐकायला येवू शकते खासदार उन्मेष दादा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार राजीवदादा देशमुख, चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी या गोळ्या लवकर उपलब्ध होतील. यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
हॉस्पिटल उपलब्ध नव्हते, रेडमीसीविर मिळत नव्हते, बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन शिल्लक नव्हते, जनतेने हे सर्व सहन केले. अनेकांनी जवळची माणसं गमावली. अनेक घर उध्वस्त झालीत लहान बालक रस्त्यावर आलीत. परंतु आता साध्या उपचाराच्या गोळ्या फॅबी फ्ल्यू देखील उपलब्ध नसल्याने
सर्व सामान्य गोर गरीब पेशंट व त्यांच्या नातेवाईकांनी काय करावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खाजगी मेडिकलमध्ये २७०० रुपयांना या गोळ्या सहज मिळतात. पण शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीत या गोळ्या लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा चाळीसगावातील गोर गरीब जनतेला वाचविण्यासाठी सर्व पक्षीय व संघटना मिळून रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल यांनी दिला आहे.
















