जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात डिसेंबरअखेर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले व तिसरी लाट सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून रुग्ण वाढू लागले.
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांचा आलेख चढताच राहिला. गुरुवारी दिवसभरात ४६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात तब्बल ८८ रुग्णांची नोंद झाली. तर एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता वाढून दोनशेवर पोहचली आहे. आरटीपीसीआरच्या १०७७ चाचण्यांमधून १० तर १४७७ ॲन्टीजेन चाचण्यांमधून ७८ अहवाल पॉझिटिव्ह आले.
असे आढळले रुग्ण
नव्या बाधितांमध्ये जळगाव शहरातील तब्बल ३१, भुसावळचे २४, चोपड्यातील २७, यावल २, रावेर १ असे बाधित आढळले. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २२३ झाली आहे. चार महिन्यांनंतर प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या दोनशे पार झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी यात केवळ २० रुग्णांना लक्षणे असून २०३ रुग्ण लक्षणे विरहित आहेत. ऑक्सिजनवर केवळ एकमेव रुग्ण आहे.