नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गरीब देशातील नागरिकांना देण्यात येणारा कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुलनेत जगभरातील श्रीमंत देशांमधील नागरिकांना सहापट अधिक कोरोना बुस्टर डोस देण्यात येत असल्याचं डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.
गरीब देशातील नागरिकांना देण्यात येणारा कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुलनेत जगभरातील श्रीमंत देशांमधील नागरिकांना सहापट अधिक कोरोना बुस्टर डोस देण्यात येत आहेत. हा प्रचंड असा असमतोल असून मोठा घोटाळाच आहे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO) डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी व्यक्त केले आहे. कोरोना प्रतिबंधक डोसच्या वाटपातील असमतोल तत्काळ थांबावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीमंत देशांनी कोरोना लसीचा साठा केला आहे. यामुळेच अनेक गरीब देशांमधील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही, असेही डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी म्हटलं आहे.
ऑगस्ट महिन्यातही डॉ. टेड्रोस गेब्रेयसियस यांनी जगभरातील श्रीमंत देशांमध्ये देण्यात येणार्या बुस्टर डोस बंद करण्यात यावेत, असे आवाहन केले होते. तसेच डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वच देशांनी बुस्टर डोस बंद करावेत, गरीब देशांना लस पुरवठा करण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटलं होते. यानंतरही जर्मनी, इस्त्रायल, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये बुस्टर डोस देण्याचे कार्यक्रम सुरुच राहिले.