नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना महामारीशी लढत देश पुढे जात आहे. पहिल्या लाटेपासून दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेपर्यंत कोरोनाने देशातील करोडो लोकांना वेठीस धरले. त्याचवेळी, सरकारी आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे मृतांचा आकडा 5 लाख 21 हजार 751 वर पोहोचला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे आकडे खोटे ठरवत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना व्हायरसमुळे ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. ट्विटरवर, राहुल गांधी यांनी एका वृत्तसंस्थेच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखत आहे.
“मोदीजी खरे बोलत नाहीत आणि बोलूही देत नाहीत. ते अजूनही खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला नाही! मी याआधीही म्हटले होते कोविडमध्ये सरकारच्या निष्काळजीपणामुळे पाच लाख नव्हे, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर मोदीजींनी आपले कर्तव्य पार पाडत प्रत्येक पीडित कुटुंबाला ४ लाख रुपयांची भरपाई द्यावी,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भारताने शनिवारी देशातील कोविड मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या एवढ्या विशाल राष्ट्राच्या मृत्यूच्या आकड्यांचा अंदाज लावण्यासाठी अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर केला जाऊ शकत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १६ एप्रिल रोजी ‘जागतिक कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यासाठी डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना भारत थांबवत आहे’ या शीर्षकाच्या लेखाला उत्तर म्हणून एक निवेदन जारी केले होते.