नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना विषाणूचा आकडा अगदी झपाट्यानं वाढू लागला आहे. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर २८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.
आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ कोरोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख १३ हजार ६५८ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ जणांचा लसीकरण झालं आहे.
सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ६६ हजार १९१ रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर उत्तर प्रदेश (३५,३११), कर्नाटक (३४,८०४), केरळ (२८,४६९) आणि दिल्लीचा (२२,९३३) क्रमांक आहे.