मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात असताना राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नव्याने आदेश जारी केले असून त्यात अनेक निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात आले आहेत. यानुसार यापुढे राज्यातील सर्व नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे.
राज्यात करोनाचा धोका वाढू लागला आहे. गेले काही दिवस १५ हजारांवर रुग्णांची दररोज भर पडत आहे. करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही लाखाच्या वर गेली आहे. मृत्यूदर कमी असला तरी वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे. त्यामुळेच नागरिकांना शिस्त लावण्यासाठी निर्बंध लावले जाण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार प्रत्यक्षात आज आदेश जारी करण्यात आला असून राज्यात नव्याने अनेक निर्बंध लावले गेले आहेत. तत्काळ प्रभावाने हे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून येत्या ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत. त्यानंतर तेव्हाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
३१ मार्चपर्यंत ‘हे’ निर्बंध कायम
१. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सिंगल स्क्रीन थीएटर्स आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने चालवण्यास परवानगी असेल.
२. कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.
३. लग्न समारंभाला केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तर अंत्यविधीला केवळ २० जण उपस्थित राहू शकतात.
४. आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने चालवावीत. वर्क फ्रॉम होमवर भर देण्यात यावा.
५. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दरताशी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण उपलब्ध जागेच्या अनुषंगाने मर्यादित करावे.
६. मॉल, थीएटर्स, हॉटेल, धार्मिक स्थळे या ठिकाणी मास्क असल्याशिवाय तसेच तापमान तपासल्याशिवाय कुणालाही प्रवेश नाही.
७. मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन व्हावे. महत्त्वाच्या पॉइंटवर हँड सॅनिटायझर ठेवावे. मॉलमधील थीएटर्स, रेस्टॉरंट्स व अन्य आस्थापनांत नियम पाळण्याबाबत व्यवस्थापनाने लक्ष ठेवावे.
८. होम क्वारंटाइन असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर शिक्का असणे बंधनकारक. घरावरही लागणार फलक. कुटुंबातील अन्य व्यक्तींनी घराबाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक कारणासाठी गेल्यास मास्क वापरावा. नियम मोडले गेल्यास संबंधित रुग्णाला तत्काळ जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलवणार.
९. कंटेन्मेंट झोनसाठी आधी लागू करण्यात आलेले निर्बंध ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहेत.
राज्यात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज कोरोनाचे १५ हजार ५१ नवे रूग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात ४८ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत १ हजार ७१३ रूग्णांची नोंद झाली आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात १५ हजारांहून जास्त रुग्ण वाढले आहेत.
सध्या २०२१ वर्षातला मार्च महिना सुरु आहे आणि राज्य पुन्हा एकदा मार्च २०२०च्या उंबरठ्यावर उभं आहे. कारण मागच्या वर्षी याच महिन्यात कोरोनाच्या प्रसारामुळं राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना रुग्णवाढ दिवसाला १ हजारापर्यंत खाली आली होती. पण पुन्हा एकदा राज्यात दिवसाला १६ हजारांच्या वर कोरोना रुग्ण सापडत आहेत.