नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून १२ वर्षांपुढील मुलांसाठी लस तयार करण्यात आली असून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली होती. दरम्यान झायडस कॅडिलाने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे.
देशात कोरोनाचा वेग आता कमी होऊ लागला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने लसीकरणालाही वेग मिळाला आहे. याच दरम्यान लहान मुलांसाठी लस आणण्यासाठी कंपन्या धडपडत आहेत. यामुळे झायडस कॅडिलाने गुरुवारी भारतात डीएनए लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. डीसीजीआयने परवानगी दिल्यास भारतात १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लहान मुलांसाठीचे बेड, व्हेंटिलेटर आदींची तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जर भारत सरकारने झायडसच्या लसीला परवानगी दिली तर कोरोना विरोधातल्या लढ्याला मोठे हत्यार मिळाले आहे. महत्वाचे म्हणजे झायडस कॅडिलाच्या या लसीची तिसरी चाचणीदेखील पूर्ण झाली आहे. जर परवानगी मिळाली तर जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये १२-१८ वयोगटाच्या मुलांना ही लस देण्यात येणार आहे.
जर केंद्र सरकारने या लसीला परवानगी दिली तर भारताकडे दुसरी स्वदेशी लस असणार आहे. या आधी भारत बायोटेकच्या कोरोना लसीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच भारत बायोटेक लहान मुलांवरची चाचण्या करत आहे.
१८ वर्षांपुढील नागरिकांची एकूण लोकसंख्या ९३ ते ९४ कोटी असून त्यासाठी एकूण लसींच्या १८६ कोटी डोसची गरज असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. सर्व वयोगटासाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असून यापुढे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात सांगितले होते.