नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत कोरोनावरील उपयायोजना, लसीकरण आणि त्यात येणा-या अडचणींसंदर्भात चर्चा होणार आहे.
महाराष्ट्रासह देशातील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्यानंतर मंगळवारी (१६ मार्च) राज्यात १७ हजार रुग्ण आढळून आले. तर ८७ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे देशातील आकडाही झपाट्याने वाढू लागला आहे. इतर राज्यातही कोरोनाचा उद्रेक होत असल्यानं पंतप्रधानांनी तातडीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे. दुपारी १२.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे होणाऱ्या बैठकीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा होणार आहे. .
देशातील विविध राज्यात संसर्ग वाढू लागल्यानंतर रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल २८ हजार ९०३ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ हजार ७४१ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. याच कालावधीत देशात १८८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली आहे का?
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहून त्याबाबत सावधानतेचा इशारा दिलाय. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचा ठपकाही केंद्रानं या पत्रात राज्य सरकारवर ठेवलाय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून अनेक सूचना केल्या आहेत. तसंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याची खंत आरोग्य सचिवांनी पत्रात व्यक्त केलीय. नागरिक नियम पाळत नसल्याचंही या पत्रात नमूद केलंय.