नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णसंख्येत दररोज मोठी वाढ नोंदवली जात आहे आणि आता दैनंदिन रुग्णसंख्या ४ लाखाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जाते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. देशवासीयांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.
गुरुवारी झालेल्या मृतांच्या संख्येपैकी सर्वाधिक ७७१ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. यानंतर दिल्ली ३९५, छत्तीसगड २५१, उत्तर प्रदेश २९५, कर्नाटक २७०, गुजरात १८०, झारखंड १४५, पंजाब १३७, राजस्थान १५८, उत्तराखंड ८५ आणि मध्य प्रदेशमध्ये ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.