धरणगाव (प्रतिनिधी) येथील कापूस उद्योगातील उद्योगमहर्षी, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांची काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई या अत्यंत प्रतिष्ठित संघटनेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड खान्देशसाठी अभिमानास्पद बाब आहे. ही संस्था कापूस पीक उद्योगावरील संशोधन आणि विकास या क्षेत्रात काम करते. या क्षेत्रातील विविदांचे लवादामार्फत सोडवणूक करते. १९२१ साली स्थापन झालेली ही संस्था कापूस उद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या संस्थेवर निवड झाल्याने खान्देशातील कापूस उद्योगाला चालना मिळून विकास वाढण्यास मदत होणार आहे.
धरणगाव शहराला सुरेशनाना चौधरी यांच्या प्रयत्नातून कापूस जिनींगची पंढरी उभी राहिली आहे. त्यांनी शहराला “कापूस उद्योगाचं शहर” ही नवी ओळख दिली आहे. रक्ताचं पाणी करणाऱ्या या कर्मयोग्यानं एका सामान्य वारकरी कुटुंबात जन्म घेवून स्वतःच्या हिमतीने कापूस खरेदीच्या व्यवसाय उभा केला. रात्रीचा दिवस करत, कपाशीच्या गाड्या परराज्यात नेवून या व्यवसायाचे बारकावे शिकून, याच व्यवसायात स्थिर स्थावर झाले. स्वतः कापूस खरेदीत राबून हजोरो लोकांचा पोशिंदा झाला. शेतकऱ्याच्या कापसाला भाव आणि बेरोजगार तरुणाईच्या हाताला काम, हे व्रत त्यांनी अंगीकारले आहे. आज अनेकांची घरे, नानांच्या जिनिंगमुळे सुरळीत चालायला लागली आहेत. ते बघता बघता ५ फॅक्टरींचे मालक झाले असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल वर्षाला करु लागले आहेत. हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणारे झाले आहेत. त्यांच्या श्रीजी जिनिंग, बिजासन जिनिंग आणि जीएस.काॅटन कंपनीच्यामार्फत भव्य, दिव्य आणि समाजोपयोगी काम उभे राहिले आहे.तेली समाजातील एक उद्यमशील व्यक्तीमत्वालाऊ “तेली-समाजरत्न” म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेवर संचालक म्हणून झालेली त्यांची ही निवड त्यांच्या कापूस उद्योगातील कार्याचा गौरव आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.