चोपडा दि.१९ (प्रतिनिधी)चोपडा तालुका ग्राम महसुल अधिकारी संघातर्फे धरणगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक व मजूर यांनी अवैध गौण खनिज उत्खनन प्रतिबंधक वाहन पथकावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.या घटनेत महसूल कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने अनेकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक गंभीर बाबीं विचारात घेतल्या जात नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला असून लक्ष घालण्याची नितांत गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. 19/12/2024 रोजी मध्यरात्री 2.15 वाजता तहसिल कार्यालय धरणगाव येथील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने मौजे चांदसर बु ता. धरणगाव येथिल गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर नायब तहसिलदार महसूल संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, ग्राम महसुल अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी पकडले असता ट्रॅक्टर चालक, मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण 12 ते 15 लोकांनी पथकावर हल्ला केला. सदर घटनेत तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना पावड्याने, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दुसरे पथक नायब तहसीलदार सातपुते व अन्य ५ तलाठी यांचेसह १५ मिनीटात नदीपात्राजवळ पोहोचले त्यांना देखील गावातील काही लोकांनी व महिलांनी अडवले व त्यांच्या मोबाईल मध्ये व्हीडीओ आहे का हे तपासून अडवण्याचे प्रयत्न केला.सदर घटनेत ग्राम महसुल अधिकारी दत्तात्रय पाटील यांचा पायाचे हाड मोडले असून त्यांना जबर दुखापत झालेली आहे. शासकीय कर्तव्यावर असतांना अश्या प्रकारे कर्मचारींवर वाळु माफियांकडून होणा-या घटनेचा चोपडा तालुका ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी घटनेचा निषेध करीत आहोत असं म्हटलं आहे.
यापुर्वी आम्ही पोलिस पथकासह गौणखनिज कार्यवाही बाबत मागणी केलेली असतांना त्याची अंमलबजावणी न होता ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचेवर दबाव टाकला जातो व रात्री अपरात्री असे वाळु माफियांकडून वारंवार हल्ले होत आहेत. अश्या घटना थांबविणे व वाळु माफियांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक व्हावी. पोलिसांच्या सहभागा व्यतिरिक्त ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी केलेल्या अवैध गौणखनिज कारवाईतील वाहन चोपडा शहर व ग्रामीण पोलिस स्टेशन चे अधिकारी जमा करण्याची तसदी घेत नाहीत व सदर वाहन जप्त केलेले वाहन तहसिल कार्यालयात जमा करा असे सांगतात. त्यामुळे नाईलाजास्तव सदर वाहन तहसिल कार्यालय आवारात बेवारसपणे (विना जबाबदारीने) जमा केले जातात व सदर वाहनाची जबाबदारी तससिलदारांकडून कारवाई करणा-या पथकावर थोपविली जाते हे सरासर चुकीचे असून कायद्यात न बसणारे आहे याबाबत आपल्या स्तरावरून योग्य तो निर्णय घेण्यात यावा तसेच शासकीय मालमत्तेची चोरी रोखण्यासाठी असलेल्या पोलिस विभाग आणि अवैध वाहनातून अवैध प्रकारे वाहतूक होवू नये याची जबाबदारी असलेल्या परिवहन विभाग यांच्या समन्वायातून योग्य वाळु धोरण तयार करावे. तसेच वाळू गटांच्या रक्षणासाठी स्वतंत्र सशस्त्र पोलिस दल नेमावे अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच पुर्वीप्रमाणे शासकीय कर्मचा-यांच्या स्व संरक्षणार्थ असलेले कलम 353 पुर्वीप्रमाणे अजामीनपात्र करावे असेही म्हटले आहे.
या निवेदन प्रसंगी अध्यक्ष गणेश आर महाजन ,सरचिटणीस किरण पि. महाजन , कार्याध्यक्ष हमीद पठाण, जिल्हा प्रतिनिधी प्रशांत पवार,उपाध्यक्ष श्रीमती. हेमलता पाटील,सल्लागार नितीन मनोरे,संघटक रविंद्र बेलदार,सह संघटक भुषण पाटील यांच्या सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.