जालना (वृत्तसंस्था) विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चुलत्याने पुतण्याचा चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घनसावंगी तालुक्यातील देवनगर तांडा येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. सुनील प्रकाश पवार (वय २३), असे मयताचे नाव आहे.
सुनील पवार यांच्या शेजारीच त्याचा चुलता प्रल्हाद नामदेव पवार याचे घर आहे. दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून शेतातील विहिरीच्या पाण्यावरून वाद सुरू होते. सोमवारी सायंकाळी ८ वाजता घरात पाणी नसल्यामुळे सुनील पवार यांचा घरात पत्नीसोबत वाद सुरु होता. तेव्हा घराशेजारील प्रल्हाद पवार, त्याची पत्नी व वडील नामदेव पवार यांनी तू विहिरीच्या पाण्यावरून कुणाला शिवीगाळ करतो, असे म्हणून सुनील पवार यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.
यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यानंतर प्रल्हाद पवार याने पुतण्या सुनील याच्या पोटात, मानेवर, हाता पायांवर सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी सुनील पवार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत सुनील याची पत्नी यशोदा हिने मंगळवारी घनसावंगी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रल्हाद नामदेव पवार, त्याची पत्नी व नामदेव सीताराम पवार यांच्या विरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.