जळगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सोमवारी जळगाव शहर मनपा अंतर्गत दोन खाजगी रुग्णालयात महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.
जळगाव शहर मनपा अंतर्गत गेल्या आठवड्यात शिवाजी नगरातील डॉ. बी. एम. जैन रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. एका केंद्रावर ५०० लाभार्थ्यांना लस देण्यात आल्यानंतर सोमवारपासून गोल्ड सिटी हॉस्पिटल आणि गाजरे हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सकाळी महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत गोल्डसिटी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. विकास बोरोले, तारीक शेख आदींसह कर्मचारीवृंद उपस्थित होते.
जळगावातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. कुणालाही काही त्रास जाणवल्यास रुग्णालयात २ ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
















