जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फुले मार्केट समोर मनपा पार्किंग जवळील रोडावर फटाके फोडून वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांचे एक पथक दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी रात्री साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास फुले मार्केट समोरील मनपा पार्किंगच्या रोडवर जोरात फटाके फुटण्याचा आवाज आल्याने कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. घटनास्थळी गेल्यावर लक्षात आले की, काही जण वाढदिवसाच्या निमित्ताने गर्दी जमून तोंडाला मास्क न लावता. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता गर्दी करून आहेत. पोलिसांनी तात्काळ संबंधितांना ताब्यात घेतले. त्यात शैलेश चंद्रकांत खेडकर (रा. कांचन नगर) किरण बाळू कोळी (रा. वाल्मिक नगर) भूषण प्रल्हाद कोडी (रा. वाल्मिक नगर) शेखर नामदेव ठाकूर (रा. वाल्मिक नगर), खुशाल दिलीप ठाकूर (रा. वाल्मिक नगर) तुषार काशिनाथ कोळी (रा. वाल्मीक नगर) अशा सहा जणांचा समावेश होता.
याप्रकरणी पो.हे.कॉ भूषण हरिश्चंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच तोंडाला मास्क न लावणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे व कोरोनाविषाणू महामारीचा प्रादुर्भाव सुरू असताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे सहाही आरोपींविरुद्ध भा.द.वि. कलम 143 181 269 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 मुंबई पोलीस कलम 37 (1) (3 )चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















