चाळीसगाव (प्रतिनिधी) प्रतिबंधक कारवाईच्या प्रस्तावात तारीख न देता जामिनावर मुक्तता करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे (47, रा.शास्त्रीनगर, प्लॉट नंबर 16, कापड मिल मागे, चाळीसगाव) यास गुरुवारी दुपारी साडेचार वाजता तहसीलमधील दालनातच अटक करण्यात आली.
30 वर्षीय तक्रारदार यांच्या पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरीता तसेच मदत करण्यासाठी यातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे यांनी गुरुवारी अडीच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने तक्रार नोंदवताच लाच पडताळणी करण्यात आली.
दुपारी साडेचार वाजता दालनातच जोंधळे यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. संशयिताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक हवालदार सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.