चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रविवारी दि. १४ रोजी मध्यरात्री दि. १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाकडून तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केळी पिकांची नवीन लागवड केलेली रोपे वाहून गेली आहेत.शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कापूस, मका यांच्यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने बांध फुटल्या आहेत.वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे जमिनीचा वरचा सुपिक थर वाहून गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे.शेती साठी लागणाऱ्या खर्चात खूपच वाढ झाल्याने नफ्याचे प्रमाणात आधीच घट झाली आहे. त्यात आता अतिपावसाने नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे.शासनाने तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत तसेच नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.