संगमनेर (वृत्तसंस्था) संगमनेरमध्ये नागरिकांची उसळलेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला आहे. संचारबंदी काळात गस्त घालत असताना दिल्ली नाका परिसरात गुरुवारी (६ मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरमध्ये संचारबंदी काळात पोलीस गस्त घालत होते. यावेळी दिल्ली नाका परिसरात जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या जमावाने पोलिसांनी तात्पुरत्या उभारलेल्या चेकनाक्याचीही तोडफोड केली. गस्त घालत असताना पोलिसांना काही लोक गर्दी करुन उभे असल्याचं दिसलं. यावेळी जमाव बंदीचा आदेश असताना गर्दी का केली विचारणा पोलिसांनी केल्यानंतर त्यांना हटकलं. मात्र जमाव अचानक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करत दगडफेक केली. तसंच परिसरात उभारलेल्या चेकनाक्याची नासधूसही जमावाने केली. या हल्ल्याचे आणि गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तर जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.