रावेर (प्रतिनिधी) रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशनंतर्गत गरीबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना अदा न करता यादीत फेरफार करून व गटविकास अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी केली. दरम्यान १ कोटी ५२ लाख ६४ हजार रूपयांचा भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोन समन्वयकांविरुध्द गुन्हा दाखल झाला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. मात्र हे अनुदान प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी बँक खाते गोठवून खातेनिहाय चौकशी समिती नेमली होती. त्यात ही बाब उघड झाली. समाधान गोंडू निंभोरे (रा श्रीकृष्ण नगर, रावेर) व मंजुश्री सुरेश पवार (रा रसलपूर ता. रावेर) यांनी अनुदानाची रक्कम काही ठराविक खात्यात वारंवार वर्ग केल्याची तसेच काही व्यक्तींच्या खाते क्रमांकावर नाव- गाव वारंवार बदलून प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम टाकल्याची गंभीर बाब चौकशी समितीच्या लक्षात आली होती. त्यानुसार प्रशासनिक अधिकारी अनिल भागवत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ४०६,४०९, ४२०,४६५,४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.