वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून प्रगत अमेरिकाही हतबल झाली आहे. कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा सर्वाधिक आकडा हा अमेरिकेत आहे. रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला असून पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेत १४ लाखांहून अधिक कोरोना केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यापूर्वी कधीही अमेरिकेत किंवा जगातील इतर कोणत्याही देशात इतक्या संख्येने रुग्ण नोंदवले गेले नव्हते.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ट्रॅकरनुसार, यूएसमध्ये १४,८१,३७५ नवीन कोव्हिड – १९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर यापूर्वी ३ जानेवारी रोजी ११.७ लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. यासह, अमेरिकेतील एकूण कोरोना प्रकरणांची संख्या आता ६,१५,५८,०८५ झाली आहे. तर सोमवारी १,९०६ मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या ८.३९,५०० वर पोहोचली आहे. सोमवारी जास्तीत जास्त प्रकरणे नोंदवली गेली. ज्या दिवशी कोरोनाची विक्रमी आकडेवारी समोर आली, त्याच दिवशी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येनेही विक्रम मोडला. अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा दुप्पट झाला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे १,४१,००० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हा आकडा १,३२,०५१ एवढा विक्रमी होता.
फ्रान्समध्येही ‘रेकॉर्डब्रेक’
फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार तेथे २४ तासांत विक्रमी ३,६८,१४९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शुक्रवारनंतर स्वीडनमध्ये विक्रमी ७०,६४१ प्रकरणे नोंदवली गेली. यादरम्यान ५४ मृत्यूंचीही नोंद झाली आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे, की जर येत्या दोन महिन्यांपर्यंत संसर्गाची प्रकरणे अशीच समोर येत राहिली तर युरोपमधील निम्म्याहून अधिक लोकसंख्येला ओमिक्रॉनची लागण होऊ शकते. यासह, फ्लूसारख्या किरकोळ आजार म्हणून ओमिक्रॉनवर उपचार करणे खूप घाइचे असल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’ने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियातही प्रकरणे वाढली
ऑस्ट्रेलियातही परिस्थिती नियंत्रणात नाही. न्यू साउथ वेल्समध्ये, एका दिवसात ३४,७५९ प्रकरणे नोंदवली गेलीत तर २,२४२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया राज्यात ४०,१२७ प्रकरणे नोंदवली गेली असून रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ९४६ होती. दोन्ही राज्यात २१ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता न्यू साउथ वेल्समध्ये, एखाद्याने कोरोनाच्या बाधित अहवालाची माहिती दिली नाही, तर त्याला १००० डॉलरचा दंड देखील ठोठावला जाईल. ब्रिटनबद्दल बोलायचे झाले तर येथे २४ तासांत १,२०,८२१ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि या कालावधीत ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे ४ जानेवारीपासून केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यानंतर २,१८,३७६ प्रकरणे दाखल झाले आहे.