जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौकालगत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ या बंगल्याला लागूनच असलेल्या भिंतीवर अज्ञातांनी आक्षेपार्ह संदेश लिहल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील गजबजलेला व सुशोभत चौक म्हणून ओळख असलेल्या काव्यरत्नावली चौक याठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. याच चौकात जिल्हा पोलीसदलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाला मेहरुणकडे एक रस्ता जातो. या रस्त्यालगत फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर अज्ञातांनी हा आक्षेपार्ह संदेश लिहिला. पोलीस विभागाचा निषेध म्हणून अनोळखी व्यक्तींनी हा संदेश लिहिला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हा संदेश लिहून संबंधितांनी थेट पोलीस विभागाला आव्हान दिल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे वर्दळीच्या चौकात पोलिसांच्याच विरोधात पोलीस अधीक्षकांच्याच बंगल्या शेजारी संदेश लिहण्याची हिंमत केल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराची पोलीस अधीक्षकांकडून तातडीने दखल घेण्यात आली. रविवारी दुपारी भिंतीवरील हा संदेश मिटविण्यात आला. भिंतीवर, ‘Fxxx the System’ असा संदेश लिहिला होता.
गुन्हा दाखल करुन संबंधितांवर कारवाई करणार
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित भिंत ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे महापालिकेची मालमत्ता असलेल्या या भिंतीवर विना परवाना अशा प्रकारचा संदेश लिहल्याने संबंधितांविरोधात डेमोस्ट्रेकली प्रॉपर्टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याचा शोध घेण्यात येवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेने जर तक्रार दिली नाही तर पोलीस स्वत: फिर्यादी होवून गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले.