नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आंध्र प्रदेशातील नेल्लोरमध्ये येथे बी फार्माच्या दोन विद्यार्थ्यांनी एका व्यक्तीचे ऑपरेशन केले, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लॉजच्या कर्मचाऱ्यांना खोलीत व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने ही बाब उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय श्रीकांत असे मृताचे नाव आहे. श्रीकांत विवाहित होता आणि पत्नीला सोडून गेला होता. तो एकटाच राहत होता. यादरम्यान तो फार्मसीच्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आला. यावेळी श्रीकांतने लिंग बदलाबाबत चर्चा केली. बी फार्माचे विद्यार्थी मस्तान आणि जीवा यांनी श्रीकांतला स्वस्त दरात लिंग बदलासाठी पटवून दिले आणि सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी श्रीकांतसोबत खासगी लॉज गाठले. इकडे जीवा आणि मस्तानने यूट्यूब पाहून श्रीकांतचे ऑपरेशन सुरू केले. ऑपरेशन दरम्यान जास्त रक्तस्राव झाल्याने श्रीकांतचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लिंग बदल केल्यानंतर श्रीकांतला मुंबईला जायचे होते
यूट्यूब पाहून ही सर्जरी करणाऱ्या मस्तान आणि जीवा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दुसरीकडे, श्रीकांत हा प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी होता आणि हैदराबादमध्ये मजूर म्हणून काम करत असे. सेक्स रिअसाइनमेंट करून त्याला मुंबईला जायचे होते.