रावेर (प्रतिनिधी) उधारीच्या १३० रुपयांसाठी गुप्तांग पिळून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना ऐनपूर ता. रावेर येथे घडली आहे. भिमसिंग जगदीश पवार (२८) असे या खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ऐनपूर येथे रात्री भीमसिंग जगदीश पवार (वय २८) या तरुणाचा खून झाला. वैयक्तीक वादातून हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ऐनपूर येथे पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. काल रात्री उधारीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. यामुळे अवघ्या १३० रूपयांसाठी भीमसिंगचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर या प्रकरणातील प्रमुख आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे कळते.