मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दोन दिवसांच्या जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. राज्यात ओमिक्रॉनचे ७ रुग्ण सापडल्याने ही संख्या १७ वर गेली आहे. अखेर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
राज्यातील ओमायक्रॉन प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ११ आणि १२ डिसेंबर रोजी मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले. त्यामुळे व्यक्ती किंवा वाहनांच्या रॅली/मोर्चे/मिरवणुका इत्यादींना मनाई करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १७ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी मुंबईत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. याआधी ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जमावबंदीसारखे निर्बंध अकोला जिल्ह्यात लावण्यात आले होते.
शुक्रवारी सापडलेला ओमायक्रॉनबाधित रुग्ण धारावीतील रहिवासी आहे. तो गेल्या आठवड्यात टांझानियातून आला आहे. त्याने लशीची एकही मात्रा घेतलेली नाही. मुंबईत आणखी दोन ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी एक लंडनहून, तर दुसरा दक्षिण आफ्रिकेतून आला होता. त्यामुळे मुंबईतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या पाच झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले चारही रुग्ण नायजेरियातून आलेल्या ओमायक्रॉनबाधित महिलेचे नातेवाईक आहेत. राज्यातील नव्या सात रुग्णांपैकी चार जणांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एकाने लशीची एक मात्रा घेतली होती, तर एकाने एकही मात्रा घेतलेली नाही. सातपैकी चार जण लक्षणेविरहित, तर तीन रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. या रुग्णांचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते.