धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विद्यमान नगरसेविका तथा माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन (रा. रामलीला चौक, मोठा माळीवाडा) यांच्या घरी साडेचार लाखाची धाडसी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तपास केल्यामुळे अवघ्या एका दिवसात दोन चोरट्यांना अटक करण्यात आली. एवढेच नव्हे तर पो.नि. हिरे यांनी चोरी गेलेले संपूर्ण ८८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. दरम्यान, दोघं आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
विजय धनलाल महाजन (रा. रामलीला चौक, धरणगाव) यांच्या घरातून १४ जानेवारी ते १८ जानेवारीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्यांचे व पत्नीचे दागिने घरातील कपाटातून चोरून नेले होते. त्यानंतर तीन-चार दिवस दागिने इतर ठिकाणी ठेवले गेले असतील, या कारणाने विजय महाजन व त्यांच्या पत्नी सुरेखा यांनी घरात शोधाशोध केली. २३ जानेवारी रोजी बाहेरील चोरट्यांनी चोरी केल्याची पूर्ण खात्री झाल्यानंतर विजय महाजन यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्या घरातून ३१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, ४१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १६ ग्रॅम वजनाचे गंठन असे एकूण ४,६१,३३१ रुपयाचे दागिने चोरीला गेले होते.
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी स्वतःकडे घेतला तपास
या धाडसी चोरीचा तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी स्वतःकडे घेतला. पो.नि. अत्यंत वेगवान गतीने तपासाला सुरुवात केली. पो.नि. हिरे यांना सुरेखा महाजन यांनी सांगितले की,चोरी झाली त्यादिवशी ते पहाटे सात वाजेला मंदिरात गेले होते. तर घरातील इतर सदस्य झोपलेले होते. दुसरीकडे पो.नि. हिरे यांनी आपल्या खबऱ्यांसह गोपनीयचे कर्मचारी मिलिंद सोनार आणि विनोद संदानशिव यांना माहिती काढायला सांगितली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी माळीवाडा परिसरातील एका दूधवाल्याने दोन-तीन दिवसांपूर्वी बुलेट घेतली असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून धरणगाव पोलिसांनी दूध विकणारा संशयित मुलगा गजानन तुकाराम माळी (रा. मोठा माळीवाडा) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने १५ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता विजय महाजन यांच्या घरातील कपाटातून ८८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याबाबत कबुली दिली. तसेच सदरचे दागिने त्याने १८ जानेवारी रोजी भडगाव तालुक्यातील कजगाव येथे तीन वेगवेगळ्या सोनारांना आपला मेहुणा बाबा वाल्मीक चौधरी (रा.कजगाव) याच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले. यावरून पोलीस निरीक्षक हिरे यांनी सदर गुन्ह्यात गजानन महाजनला अटक करत थेट कजगाव गाठले. त्यानंतर संबंधित सोनाराकडून चोरीतील ब्रेसलेट हस्तगत करण्यात आले. तर आज २४ जानेवारी रोजी इतर दोन सोनारांकडून देखील दागिने जप्त करण्यात आले. या गुन्ह्यातील पुर्ण ८८ ग्रॅम सोने धरणगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात हस्तगत केले आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान घरातून बाहेर जाताना किमती दागिने जपून ठेवावेत तसेच घराबाहेर व गल्लोगल्ली जागी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत असे आवाहन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.
खाक्या दाखविताच बोलला चोरटा
गजानन माळी या संशयिताने सर्व सोने कजगाव येथे आपल्या नातेवाईकाच्या मदतीने वेगवेगळ्या सोनारांकडे मोडले आणि त्या पैशांनी दोन सोन्याच्या अंगठ्या केल्या. एवढेच नव्हे तर एक नवीन बुलेट देखील घेतली होती. पोलिसांना संशय येताच त्यांनी गजाननला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तपासाची सूत्र आपल्याला हातात घेतली. गजानन हा उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यावर पो.नि. हिरे यांनी खाक्या दाखविताच मात्र, गजाननने सर्व हकीगत सांगितली. दरम्यान, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तपास केल्यामुळे या धाडसी चोरीचा उलगडा होवू शकला.