धुळे (प्रतिनिधी) शहरातील देवपूर भागात असलेल्या लक्ष्मी नगरात अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा धाडसी घरफोडी करून रोकडसह सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ५ हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शहरातील लक्ष्मीनगर प्लॉट नंबर ८ – ब मध्ये कन्हैयालाल पतपेढीचे सेवानिवृत्त व्यवस्थापक रमेश हिरामण सावंत हे राहतात. त्यांची पत्नी सुरेखा रमेश सावंत या धुळे महानगरपालिकेत नगर सचिव कार्यालयात कार्यरत आहेत. काल (दि.२२) सकाळी ११ वाजता रमेश सावंत हे पत्नी सुरेखा सावंत यांना महापालिकेत कामावर सोडण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. ते दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा व कुलूप तुटलेले आढळून आले. त्यांनी घरात प्रवेश करून पहाणी केली असता बेडरूममधील कपाट व त्यातील ड्रॉवर तुटलेले आढळून आले.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी देवपूर पोलीस ठाण्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच देवपूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे, पोलीस कर्मचारी पंकज चव्हाण, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, शशीकांत वाघ हे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घराची पाहणी केल्यानंतर घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले. श्वानाने दूरवर माग काढला. या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने, ५ हजार रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.