भुसावळ ः शहरातील शांती नगरातील प.क.कोटेचा महाविद्यालयाजवळील सिद्धीविनायक अपार्टमेंटमागील बंद घरात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत तीन लाख 32 हजारांचा ऐवज लांबवला. 30 रोजी रात्री 10 ते 1 मे रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान ही घरफोडी झाली. शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चोरट्यांनी एकूण 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले असून त्याचे आजच्या बाजारभावानुसार मूल्य सुमारे सात लाख रुपये इतके आहे मात्र पोलिसांनी जुन्या दरानुसार दागिण्यांची नोंद घेतली आहे.
घरफोडीमुळे उडाली खळबळ
भगवान साहेबराव पाटील (34, सिद्धीविनायक अपार्टमेंटमागे, शांती नगर, भुसावळ) हे सरकारी नोकरदार आहेत. 30 रोजी पाटील कुटूंब बाहेरगावी गेल्यानंतर घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी स्टीलच्या डब्यातील 30 ग्रॅम वजनाचे व 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट, 70 हजार रुपये किंमतीची 28.67 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 25 हजार रुपये किंमतीची 10.200 वजनाची सोन्याची पोत, 25 हजार रुपये किंमतीची 9.890 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 20 हजार रुपये किंमतीचे व 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 12 हजार पाचशे रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची कर्णफुले, 12 हजार पाचशे रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, साडेसात हजार रुपये किंमतीची 3.810 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपये किंमतीचा चांदीच्या तोरड्या, 75 हजारांची रोकड असा एकूण तीन लाख 32 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.