मुंबई (वृत्तसंस्था) येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, या सभेचा दिवस पोलिसांच्या परवानगीसह निश्चित झाला आहे. ठाण्यामधील मनसेची ९ एप्रिल रोजी होणारी सभा रद्द झाली असून ती आता १२ एप्रिल रोजी होणार आहे.
९ एप्रिल रोजी ठाण्यात मोकळ्या जागेवर राज ठाकरे यांच्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकरली होती. रस्त्यावर वाहतूक समस्या निर्माण होण्याचं कारण देण्यात आलं होतं. शिवाय, इतर कोणत्याही सभागृहात सभा घेण्याची सूचना पोलिसांकडून मनसेला करण्यात आली होती. परंतु परवानगी नाकारल्यानतंरही गडकरी रंगायतन बाहेर सभा घेण्यावर मनसे ठाम होती. त्यामुळे आता ही सभा ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी होणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पत्रकारपरिषद घेऊन माहिती देण्यात आली. या पत्रकारपरिषदेस मनेसेचे नेते अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, आमदार राजू पाटील आदींची उपस्थिती होती.
पत्रकारपरिषदेत बोलताना मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितले की, “आम्ही पहिल्यांदा गुढीपाडव्याला जी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी सभा झाली, त्यानंतर ९ एप्रिल रोजी ठाण्यात उत्तर सभा होणार असं आम्ही जाहीर केलं होतं. त्याची संपूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. आज पोलिसांच्या परवानगीसाठी आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि मी असे सकाळी परवानगीसाठी पोलीस आयुक्तांकडे गेलो. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की, सभा रस्त्यावर करू नका, मैदानात करा. पण दुर्दैवाने ठाणे शहरात असं एकही मैदान नाही, की राज ठाकरे यांची सभा तिकडे होऊ शकेल. म्हणून आता खरोखरच कुठलाही पर्याय ठाण्यामध्ये नसल्यामळे आम्ही मागील वेळी गडकरी रंगायतनच्या बाहेर जी सभा घेतलेली, तशाचप्रकारची सभा गडकरी रंगायतनच्या दुसऱ्या रस्त्यावर घ्यायची असं निवेदन दिलं होतं. परंतु पोलिसांकडून परवानगी देण्यास विलंबं होत होता. मला कल्पना नाही की त्यांच्यावर कुणाचा दबाव होता की काय सुरू होतं? परंतु आणखी एक महत्वाचा मुद्दा आम्ही लक्षात घेतला तो म्हणजे चैत्र नवरात्र सुरू आहे. सुट्टीचे दिवस आहे, रविवार होता आणि त्या दिवशी अष्टमीचा दिवस आहे. त्यामुळे अनेक आमच्या भगिनी देवी दर्शनासाठी बाहेर पडतात आणि या सगळ्या गर्दीचा परिणाम वाहतुकीवर होईल, जनमाणसावर होईल. म्हणून आम्ही पोलिसांना पर्याय म्हणून १२ एप्रिल ही तारीख दिली, की १० एप्रिल रोजी नवरात्र संपल्यानंतर १२ एप्रिल रोजी त्याच ठिकाणी आम्ही सभा करण्याचं योजलेलं आहे. मी ठाणे पोलिसांचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसलेली जी उत्तर सभा आहे, ती तलाव पाळीला गडकरी रंगायतनच्या दुसऱ्या रस्त्यावर ही होणार आहे आणि ही पोलिसांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे.” अशी माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांना आज पत्रकारपरिषदेत दिली.