नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने २ ते १८ वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीची चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिनची दुसरी आणि तिसरी चाचणी घेण्यास डीसीजीआयने परवानगी दिली. त्यानुसार ५२५ स्वयंसेवकावर चाचणी होणार आहे.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती.
भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. सविस्तर चर्चेनंतर समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची शिफारस करणार आहे. लशीच्या मुलांवर चाचण्या करण्यावर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती त्या वेळी कंपनीला सुधारित वैद्यकीय चाचण्या संचालन प्रक्रिया सादर करण्यास सांगण्यात आले होते.