छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) सिल्लोड तालुक्यातील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पूजा दत्ता बेले (वय १५, रा. पुसद) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.
सिल्लोड येथील लिटल वंडर स्कूलमध्ये पूजा दत्ता बेले ही विद्यार्थिनी नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. पूजाला बुधवारी ताप आला होता. त्यामुळे तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ती वसतिगृहात गेली. शुक्रवारी सकाळी पुन्हा तिला ताप आला.
सकाळी १० वाजता खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तिच्या आई, वडिलांनी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पूजाचा मृतदेह बघताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.