पुणे (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना धमकी देणारा फोन (Threat Call) डायल 112 ला आला होता. फोन करणाऱ्याने ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’ असं बोलून फोन कट केला. मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन करणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 112 या आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकावर एका व्यक्तीने फोन करुन ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’, अशी धमकी दिली. एवढे एकच वाक्य बोलून व्यक्तीने फोन कट केला. पोलिसांनी तातडीने याचा तपास केला असता पुण्यातील वारजे या भागातून हा फोन आल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
याप्रकरणी पोलिसांनी राजेश आगवणे याला अटक केलीय. त्याने आधी दारूच्या नशेत रुग्णवाहिकेला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. पुणे पोलिसांनी त्याला अटक केलीय. तो धारावी, मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक सांगत आहेत.
काल रात्री प्रथम त्याने ११२ वर कॉल करून छातीत दुखतंय एम्ब्युलन्स पाठवा असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबर वरून माननीय मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देण्याचा कॉल केला. यानंतर त्याची माहिती घेऊन जेव्हा ताब्यात घेतलं गेलं तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले.
















