नाशिक (वृत्तसंस्था) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली असून, तसा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला आहे. यासंदर्भात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुजबळ यांना मध्यंतरी अशाच प्रकारे पुण्याहून एका व्यक्तीने मोबाइलवरून धमकी दिली होती. नंतर पोलिसांनी त्याला अटकही केली होती. आता फोनवरून नव्हेतर, व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे धमकी दिली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अंबादास खैरे यांनी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
अंबादास खैरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एकाने भुजबळ यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला. त्यात ‘तू जास्त दिवस राहणार नाही, तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही, तू नीट राहा. नाहीतर तुला बघून घेईन.’ अशी धमकी देण्यात आली आहे. ही धमकी नेमकी कोणत्या कारणातून देण्यात आली आहे, याचा उलगडा मेसेजमधून होऊ शकलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.