अमरावती (वृत्तसंस्था) बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना मोबाइलवर कॉल करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांचे स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली.
आ. रवी राणा यांना मंगळवार, ११ जुलै रोजी सायंकाळी एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. संभाजीनगर येथून बोलत असल्याचे सांगून समोरील व्यक्तीने त्यांना अन्यथा तुमच्या जिवाचे बरेवाईट करू, अचानक काही घडले किंवा अपघात झाला, तर काही म्हणू नका. तुमच्यावर मी व माझे कार्यकर्ते लवकरच हल्ला करणार आहेत. तुम्हाला आम्ही सोडणार नाही.
आमच्या विरोधात कसे काय बोलता, हे आम्ही अमरावतीत येऊन दाखवून देऊ. आता थांबले नाही, तर तुम्हाला संपवून टाकू, अशा धमक्या दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी आमदार रवी राणा यांचे स्वीय साहाय्यक यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून संबंधिताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, राज्यातील मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना देखील फोनवरून धमक्या देण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.