धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यासह जळगाव ग्रामीण मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे धरणगाव तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
धरणगाव तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बळीराजाने पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे पीक धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जास्त प्रमाणात पेरले आहे. परंतू रोज दिवसातून तीन वेळेस पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळं शेतकरी वर्ग प्रचंड प्रमाणात हैराण झालेला दिसून येत आहे. यावर्षी मूग, कापूस, मका या पिकांची तर अक्षरशः अतिपावसामुळं झाडावरच कोंब आलेले दिसून येत आहे. अगोदरच शेतकऱ्यांनी कोरोना काळात आर्थिक संकट कोसळले असून आता पावसामुळे हतबल झालेले दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मात्र, पिक विमा मिळत नाहीय. तर शेतकऱ्यांचा विश्वास देखील त्यांच्यावरही राहत नाहीय. बियाणे रासायनिक खते पिकांवरील औषध यांच्या किमती देखील दुपटीने वाढलेल्या असून शेतकऱ्याने सोसायट्यामधून कर्ज काढून शेतीत मशागत केलेली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, धरणगाव तालुक्यासह जळगाव ग्रामीण भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंदन पाटील यांनी दिला आहे.