नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) गावातील फुलझडी भागाजवळील जांभुळाच्या झाडाखाली एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रदिप मगन सैदाणे (रा. नांदेड ता.धरणगाव) यांनी पोलिसात खबर दिली आहे. त्यात म्हटले आहे की, १३ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास नादेंड गावातीलच महेंद्र जिवराम कोळी यांनी श्री. सैदाणे यांना सांगितले की, नांदेड गावातील बौद्ध स्मशानभुमी कडे जाणा-या रस्त्यालगत फुलझाडी भागाजवळील जांभुळाच्या झाडाखाली एक इसम पडलेला आहे. त्यानुसार दोघांनी जाणून घटनास्थळी बघितले असता साधारण ४५ ते ५० वयोगटातील इसमाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत फुलझाडी भागाजवळ पडलेला दिसला. कुजलेल्या मृतदेहामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
प्रदीप सैदाणे यांनी लागलीच याची माहिती धरणगाव पोलिसांना कळवली. थोड्याच वेळात घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. याबाबत धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स. फो. करीम सैय्यद हे करीत आहेत. दरम्यान, मृतदेह नेमका कुणाचा?, मृत्यू नेमका कसा झाला?, याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही. धरणगाव पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.