जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा वाढता प्रादूर्भाव पाहता आरोग्य सेवेवर सर्वत्र मोठा ताण येत आहे. कोरोनाबाधित रूग्णांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने जळगावातील सेवारत संस्थेतर्फे ऑक्सिजन सुविधायुक्त पाच रूग्णवाहिकांचे लोकार्पण गुरूवारी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.
जिल्ह्यात मार्च २०२० च्या तिसर्या सप्ताहात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत गेली. अशावेळी बर्याच रूग्णांचा रूग्णालयात नेतांना ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या कठोर अंमलबजावणीअंती कोरोना साथरोग प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, परंतु जिल्ह्यात कोरोना रूग्णांना रूग्णवाहिकेची सेवा अविरत मिळावी यासाठी दात्यांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्तपणे मिळालेल्या प्रतिसादातून पाच रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.
तसेच दोन रूग्णवाहिका तयार करण्यात येत असून आणखी पाच रूग्णवाहिका देखील लवकरच रूग्णसेवेसाठी दाखल होत आहेत. गरजू रूग्णांसाठी प्रसंगी विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून या सर्व रूग्णवाहिका ऑक्सिजन सुविधायुक्त असल्याचे सेवारत संस्थेचे प्रमुख दिलीप गांधी यांनी रूग्णवाहिकांच्या लोकार्पणप्रसंगी सांगितले.
यावेळी सेवारत संस्थेचे प्रमुख दिलीप गांधी, डॉ. निलेश पाटील, डॉ. निलीमा सेठीया, महेन्द्र रायसोनी, कंवरलाल संघवी, रोटरी अध्यक्षा अपर्णा भट, उपाध्यक्ष काबरा, जळगाव अध्यक्ष जितेंद्र ढाके, प्रकाश सेठीया उपस्थित होते.