बोदवड (प्रतिनिधी) वृत्तपत्रात खोटे दस्तावेज सादर करीत टोकरे कोळीचे बनावट जात प्रमाणपत्र धरणगाव तहसील कार्यालयाने जारी केल्याचा गंभीर आरोप मुक्ताईनगरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय संतोष कांडेलकर यांनी केला होता. हे वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारास तहसीलदार यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. ही बाब चुकीची असून या नोटीस देणाऱ्या धरणगाव तहसीलदार यांचा निषेध बोदवड येथील पत्रकारांनी केला असून या तहसीलदारांवर महसूल प्रशासनाने कारवाई करावी, असे निवेदन महसूलमंत्री व विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे एकाने ग्रामपंचायतचे सदस्य पद भुषविण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. याबाबत एरंडोल उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांचे दुय्यम अधिकारी चौकशी कशी करतील?, असा सवाल मुख्य तक्रारकर्ते श्री. कांडेलकर यांनी उपस्थित केला होता. ही बातमी दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. विशेष म्हणजे धरणगावात लोकमतचे दोन प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ही बातमी कुणी दिली?, याची अधिकृत माहिती दैनिकाच्या संपादकीय विभागाकडून न घेता ती नोटीस फक्त पत्रकार कल्पेश महाजन यांनाचा पाठवण्यात आली. विशेष म्हणजे ते घरी नसतांना देखील जबरदस्तीने नोटीस घराच्या भिंतीवर चिपकवण्याची धमकी देण्यात आली. बातम्या म्हणजे आपल्या अवतीभोवती काय घडत आहे हे जाणून घेण्याच्या वाचकांच्या अधिकाराचा भाग आहे.
अशा बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविताना पोलीस ठाण्यातील नोंदीचा किंवा तक्रारदार यांच्या तक्रारीचा आधार घेतला जातो. तसेच तक्रारदाराच्या अधिकृत तक्रारी व त्यास त्यावर प्राप्त उत्तरे याची माहीती तक्रारदार देतात. त्या आधारे बातमी प्रसिद्ध केली जाते. या सगळ्या गोष्टी माहित असूनही तहसीलदार नितीन देवरेंकडून पीआरबी कायद्याचे जाणून बुजून उल्लंघन झाले आहे. या विषयाशी निगडीत बातम्या प्रकाशित करू नयेत, यासाठी हा पत्रकारांवर टाकलेले दबाबतंत्र आहे. या दबावतंत्राचा बोदवड तालुक्यातील पत्रकारांनी निषेध केला आहे. महेंद्र पाटील, डॉ.पुरुषोत्तम गड्डम, निवृत्ती ढोले, संदीप वैष्णव, गोपाल व्यास, अमोल अमोदकर, गणेश पाटील, विनोद शिंदे, सुहास बारी, सचिन महाजन, विकास पाटील, नाना पाटील, गोपीचंद सुरवाडे,रवी मराठे, अर्जुन आसने,जितेंद्र पारधी, जिया शेख,नितीन चव्हाण, राजेंद्र शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.