नवी दिल्ली प्रतिनिधी । यंदा फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज 15 जणांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कठोर कलमांखाली व्यापक कटाचे तब्बल 10हजार पानांचे आरोपपत्र आज कडकडडूमा न्यायालयात सादर केले.
ताहिर हुसेन, मोहम्मद परवेझ अहमद, मोहम्मद इलियास, सैफी खालिद, इशरत जहां, मीरान हैदर, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा, शहदाब अहमद, नताशा नरवाल, देवांगना कलिता, तसलीम अहमद, सलीम मलिक, मोहम्मद सलीम खान आणि अथर खान अशी आरोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरोधात सीडी-आर आणि व्हॉट्स ऍप चॅटच्या आधारे आरोप ठेवण्यात आले असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांना सांगितले. या सर्वांवर तब्बल 10 हजार पानांचे आरोपपत्र ठेवण्यात आले असून पोलिसांनी 747 साक्षीदारांची यादी तयार केली आहे. त्यापैकी 51 जणांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपले ज्ब्ब् नोंदवलेले आहेत.
बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली अंतिम अहवाल दाखल केला आहे. गुन्ह्य आणि संबंधित घटनांचा घटनाक्रमही आरोपपत्रामध्ये नमूद केला गेला आहे. त्याबाबत लवकरच विचार केला जाणार आहे. याशिवाय दंगल घडली त्या 24 फेब्रुवारी रोजीचे व्हॉट्स चॅट पुरावा म्हणून सादर केला गेला आहे. या चॅटद्वारे दंगलखोरांना हिंसा घडवण्याचे मार्गदर्शन केले गेले होते, असेही पोलिसांनी सांगितले. सीलामपूर-जाफराबाद परिसरात हिंसाचार घडवणाऱ्यांसाठी व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला होता. शहरातील 25 ठिकाणी हिंसाचार घडवण्याचे नियोजन होते. प्रत्येक शहरासाठी व्हॉट्स ऍप ग्रुप केले गेले होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधी आंदोलनाच्या आडून हिंसाचार घडवण्याचा कट केला गेला होता, असे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.