धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील धरणी नाल्यालगत असलेल्या रस्त्यावर संरक्षण कठळे तात्काळ लावण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व दुकानदारांकडून करण्यात येत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेविका संगीता मराठे यांनी दिला आहे.
धरणगाव शहरातील धरणी नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर वस्ती असून, याठिकाणी दिवस-रात्र नागरिकांची वर्दळ असते. नगरपालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी या भागातील रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, रस्ता व नाल्याची रुंदी एकाच पातळीवर असून, रस्त्यालगत कुठल्याही प्रकारचे संरक्षण कठळे बसवण्यात आलेले नाहीत.
ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर काळजी घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. रस्ता निसरडा असल्याने नाल्यात वाहने पडण्याचा धोका वाढला आहे. कोणताही अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.
नगरपालिका प्रशासनाने रस्ता तयार करताना दुर्लक्ष केले आहे. जर लवकरात लवकर कठळे लावले नाहीत, तर अपघात झाल्यास जबाबदार कोण? याचे उत्तर नगरपालिका प्रशासनाला द्यावे लागेल. यासंदर्भात त्वरित कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
– संगीता मराठे, माजी नगरसेविका
धरणी नाल्यालगत असलेले रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, नाल्याच्या संरक्षणासाठी कठळे लावले गेले नाहीत. रस्ता व नाल्याची पातळी एकच असल्याने वाहनचालकांना धोका आहे. लवकरात लवकर यावर उपाययोजना व्हावी, ही आमची मागणी आहे.”
– अतुल येवले, स्थानिक दुकानदार
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि माजी नगरसेविका यांच्याकडून प्रशासनावर दबाव वाढत असून, लवकरात लवकर कठळे बसवण्यात यावेत, अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे.
















