मुक्ताईनगर प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) समावेश करण्यात यावा, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत अतारांकित प्रश्नाद्वारे केली.
आ. खडसे यांनी सभागृहात सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील पाडळसरे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाकडून सुमारे २८०० कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असून, त्याचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्यास केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळू शकते. त्यामुळे या प्रकल्पाचा PMKSY योजनेत तत्काळ समावेश करण्यात यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
या संदर्भात आ. खडसे यांनी शासनाकडे विचारणा केली की, पाडळसरे प्रकल्पाचा PMKSY योजनेत समावेश करण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे का? असल्यास, या प्रकरणी आतापर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे किंवा करण्यात येत आहे, याची सविस्तर माहिती सभागृहाला द्यावी.
या प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, केंद्रीय जल आयोगाच्या दिनांक ११ मार्च २०२४ रोजीच्या पत्रानुसार निम्न तापी पाडळसरे प्रकल्पासाठी २,८८८.४८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सदर प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याबाबत शासन पत्र दिनांक ३१ मे २०२४ अन्वये केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पाडळसरे प्रकल्पाचा PMKSY योजनेत समावेश झाल्यास जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेती सिंचनाखाली येणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या समावेशासाठी राज्य शासनाने केंद्राकडे अधिक वेगाने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















